Wednesday, January 3, 2018


बोधकथा : मावळे विरुद्ध कावळे


दंगलीची सुरुवात कुठुन होते ?  समाजात किरकोळ कारणावरुन कुठेतरी वादाची एखादी ठिणगी पडते आणि त्यामुळे सगळा समाज पेटुन उठतो. वाद सुरु होतात, दंगली सुरु होतात. तोडफोड सुरु होते. जाळपोळ सुरु होते. त्याचा फटका निरपराध सर्वसामान्य लोकांनाच बसतो. ज्यांची काही चुक नसते अशा लोकांना त्रास होतो. वृद्ध, महिला, बालके भीतीच्या सावटाखाली जातात.
एवढेच नाही तर सामाजिक तेढ निर्माण होते. एकमेकांची मने दुखावली जातात. एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो. जोडलेली माणसं तुटतात. एकमेकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. याचा परिणाम दीर्घकाळ टिकुन राहतो. संपुर्ण सामाजिक वातावरण गढुळ होऊन जाते. लोकांच्या मनात एकमेकांविषयी कायमस्वरुपी अढी तयार होते. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभुमीवर ही बोधकथा मार्मिक आहे.
बोधकथा : मावळे विरुद्ध कावळे
एके दिवशी एक कावळा आणि त्याचे पिल्लु झाडावर बसलेले असतात. कावळ्याचे पिल्लु वडिलांना म्हणते,
बाबा, मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले, पण माणसांचे मांस कधीच खाल्ले नाही. कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा ?
कावळा म्हणाला,
आजपर्यंत मी अनेकदा माणसाचे मांस खाल्ले आहे. बऱ्याच ठिकाणी ! खुपच चविष्ट असते ते !
पिल्लु लगेच हट्ट करु लागले की त्यालासुद्धा माणसाचे मांस खायचे आहे. कावळा म्हणाला,
ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला ही चतुराई शिकवुन ठेवली आहे, ज्यामुळे आपल्या पोटापाण्याची सोय होऊ शकेल.
पिल्लाने तात्काळ होकार दिला.
त्यानंतर कावळ्याने पिल्लाला एका जागी बसवले. तो उडुन निघुन गेला आणि परत येताना तोंडात मांसाचे दोन तुकडे घेऊन आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला आणि दुसरा तुकडा पिल्लाच्या तोंडात दिला.
तुकडा तोंडात घेताक्षणी पिल्लु म्हणाले,
शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको.
कावळा म्हणाला,
थांब बाळा, तो तुकडा खाण्यासाठी आणला नाही. या एका तुकड्यापासुन आपण आता मांसाचा ढीग तयार करणार आहोत. फक्त उद्या पर्यंत वाट बघ. तुला उद्या ताजं मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे.
पिल्लाला कळले नाही की एका मांसाच्या तुकड्यापासुन मांसाचा ढीग कसा काय निर्माण होणार ? पण त्याचा आपल्या वडिलांवर विश्वास होता. तो शांतपणे बसुन पाहु लागला.
थोड्या वेळाने कावळा एक तुकडा घेऊन आकाशात उडाला. आपल्या तोंडातील मांसाचा तुकडा एका मंदिरात टाकुन कावळा परत आला. दुसरा तुकडा उचलुन तो पुन्हा उडाला आणि तो तुकडा एका मशिदीत टाकुन तो माघारी आला. तिथुन कावळा आणि पिल्लु उंच झाडावर येऊन बसले. कावळा पिल्लाला म्हणाला,
आता बघ उद्या सकाळपर्यंत तुला मांस खायला मिळते की नाही ते ?
थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला. प्रचंड गोंधळ. फोडाफोडी, पेटवापेटवी, मारामारी सुरु झाली. ना कुणाला कुणाचे ऐकु येत होते. ना कोणी कोणाचे ऐकुन घेत होते. फक्त जात आणि धर्म नावाच्या भावना विखारी झाल्या होत्या. जातीधर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेता फक्त जात आणि धर्म बघुन एकमेकांवर वार चालु होते.

आमच्या जातीधर्माचा अपमान झाला आहे. आपण त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे म्हणत लोक एकमेकांना मारत सुटले होते. निरपराध लोकही त्यांच्या तावडीतुन सुटत नव्हते. वाहने जाळली जात होती. दुकाने फोडली जात होती. रस्ते अडवले जात होते. सगळीकडे नंगानाच सुरु होता. खुप वेळ यातच निघुन गेला. पोलीस आले. त्यांनी वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला. हळुहळु गाव शांत होऊ लागले. रस्त्यावर जिकडेतिकडे फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. ते रक्त लाल रंगाचे होते. त्यात कुठल्याच जातीधर्माची छटा नव्हती. ते रक्त फक्त एकच जात आणि एकच धर्म पाळत होते, ते म्हणजे उतार असेल तिकडे वाहणे.
आता गाव निर्मनुष्य भकास झाले होते. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. जागोजागी माणसांच्या प्रेतं पडली होती. या सगळ्या धुमश्चक्रीतुन फक्त दोनच जीव वाचले होते. झाडावरचा कावळा आणि त्याचे पिल्लु ! आता कावळ्याच्या पिल्लाला समजलं होतं. आता पिल्लु सुद्धा शिकारीची कला शिकलं होतं.
पिल्लाने कावळ्याला प्रश्न विचारला,
बाबा, हे असेच नेहमी होते का ? आपण भांडणे लावतो आणि या माणसांच्या लक्षात कसे येत नाही ?
कावळा म्हणाला,
“अरे या मुर्ख माणसांना कधीच स्वतःचा धर्म कळला नाही. इतिहासात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन लढणाऱ्या मावळ्यांचे हे वंशज ! माणुसकी हा यांचा खरा धर्म ! परंतु आता आपला माणुसकी धर्म विसरुन हे सगळ्या जातीतील मावळे नको त्या गोष्टी करत बसले आहेत. आपल्यासारखे कावळे त्यांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन जातात, हे त्या मावळ्यांना अजुनही लक्षात येत नाही. माणुस म्हणुन जगण्यापेक्षा त्यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे. आपण कावळे त्याचा गैरफायदा घेतो आणि हे मावळे बसतात एकमेकांची डोकी फोडत. पण तु जाऊ दे ! आता आपल्याला ताजं मांस मिळाले आहे ना ! चल मग मस्तपैकी ताव मारु…”
इतके बोलुन कावळा आणि पिल्लु ताजे ताजे मांस खाण्यासाठी उडुन गेले.
बोध – तुम्हीच सांगा !

No comments:

Post a Comment

गैस बुकिंग मोबाइल नंबर कैसे बदले | भारत गैस बुकिंग मोबाइल नंबर कसा बदलावा

भारत गैस बुकिंग मोबाइल नंबर चेंज – Bharat Gas Online Number Kaise Badle नमस्कार दोस्तों, इस  वीडियो  में  हम  आपको  बताने  वाले  है  ...